काही गोष्टी काही वस्तु आपल्याला खुप महत्वाची आठवण वाटतात……..
त्या वस्तु रुपी आठवणी आयुष्यभर आपल्या सोबत अडगळीत का असेना त्या जपाव्या अश्या वाटतात……
पण नियतिच्या मनात काही निर्दयी भाव गाढलेले असतात.नेमकी तिच वस्तु कळत न कळत आपल्या पासुन दुर होऊन जाते कायमचीच………
असंच एकदा माझ्या कडुनही घडलंय.एकतर्फी प्रेम दुतर्फी व्हावे आणि प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावे यासाठी बहुत कष्ट घेतले. त्यातलाच एक प्रपंच म्हणजे पत्र लेखन…….प्रेम पत्र…….
आजवर अनेक कविता लिहल्या अनेक लेख लिहिले अनेकांनी त्यांची स्तुती सुद्धा केली. पण त्या दिवशी लिहिलेल्या प्रेमपत्राची सर आजवर माझ्या कोणत्याही लिखाणाला नाही…. आणि येणार ही नाही ………….
कॉलेजचे डेज चालु होते. 2 दिवसांनी रोज डे म्हणजे गुलाबाचे फुल देण्याचा दिवस ठरवला होता. त्यासाठी मनी निश्चय केला की त्यादिवशी तिला गुलाबाचे फुल द्यायचे आणि सोबत प्रेमपत्र ही…….
कायम तिच्या समोर उडणारी धांदल निदान ह्या प्रेमपत्रात तरी होणार नाही. अखेर त्या GATE परीक्षेच्या नोट्स काढलेल्या वहीच्या एका मधल्या पानावर मनातल्या गोष्टी लिहून काढल्या . तिचे मनाला भावणारे लोभस रूप शब्दरूपात कागदावर उतारले. आणि तिचे आभार ही मांडले तिच्या मुळे माझ्या दृष्टीकोन बदलला होता त्यासाठी..
पण लक्षात आले की नेहमी प्रमाणे आपल्या अक्षरात कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला लागले होते. तिला अक्षर बघुन किळस येऊ नये म्हणुन एक जिवलगा कडुन ते स्वच्छ सुंदर पानावर उतरून घेतले. तो जिवलग अधिसुद्धा तिच्या शी मनातील भाव व्यक्त करताना सोबत होता आणि आज ही. आयुष्यात काही कमावले नाही तरी चालेल पण हे अशे जिवलग नक्की कमवावे.
अजुन एक दुसरा जिवलग ज्याच्यामुळे पहिल्यादा मी तिच्याशी बोलण्यास तयार झालो होतो त्याच्याकडून एकदा पत्राबाबत विचार घेतला. त्यांच्या कडुन होकार आल्यानंतर सगळं फिक्स झाले. दिवस उजाडला पण त्या दिवशी पत्रही खिश्यात राहिले आणि गुलाबाचे फुल सुद्धा.पण दुसऱ्या दिवशी पुन्हा निश्चय केला. नवीन गुलाब विकत आणला त्याचे काटे काढले. हाताला जखम झाली पण तीही सुखावह वाटली. अखेर योग जुळून आला ती गाडीत बसली मी गेलो आणि पत्र आणि गुलाबाचे फुलं दिले पण तिने घेतलेच नाही. पण इथे आमचे दुसरे जिवलग पुन्हा कामात आले त्यांनी जबरदस्तीने तिला घ्यायला भाग पाडले. पत्र गाडीच्या डेस्क वरच पडलेले होते.तिने काही वाचले नाही. पण आता तिसरे जिवलग कामात आले. त्यांनी तिला वाचण्याचा अग्रह केला आणि तिने वाचेल. पुढे तिच्या कडच्या पत्राचे काय झाले काय माहीत.
समोरून तीळभर हि प्रेमाची चाहुल नसताना त्या पत्राने निश्चित कचऱ्याच्या डब्याची वाट धरली असणार .
असो,मन मात्र खुष होते ती नाही म्हंटली ठिक आहे पण निदान ते पत्र तरी तिच्यापर्यंत पोहोचले.
नंतर अनेक दिवस त्या पत्राचा कच्चा मसुदा जो माझ्या एका वहीत बंदिस्त होता तो मी एकांतात वाचायचो अनही मनाला थोडा आधार द्यायचो..
घडलेला सगळा घटनाक्रम पुन्हा पुन्हा नजरे समोर यायचा आणि मन गदगद करायचा……
पण नियतीने तिची साथ तर लिहिली नव्हतीच परंतु ज्यात तिचा अखंड उल्लेख आहे तो पत्राचा मसुदा जो मी आयुष्यभर जवळ बाळगण्याचा विचार करत होतो त्याची साथसुद्धा नियतीला मान्य नव्हती…..
कोण्या एका ज्युनिअर ने ती वही मागितली मी दोस्ती साठी दिली सुद्धा . नंतर मला ती वही पुन्हा मिळालीच नाही.तो अमुल्य ठेवा ज्याची मी आयुष्यभर पारायण करण्याचा विचार करणार होतो तो कायमचा त्या वही सोबत माझ्यापासुन दुर झाला होता.
ती वही कायमचीच बंद झाली. त्या पत्राचे पुसट अक्षर नेहमी मनात येते पण करणार काय आज कुठल्या तरी रद्दीवल्याच्या दुकानात तो मसुदा,तो प्रेम आलाप,ते पत्र,माझ्या भावना बंद वहीत कुजत पडले असेल.
दुःख इतकेच कि तो माझा दोन पानांचा बायबल,कुराण अथवा गीता माझा मास्टरपीस आज माझ्या जवळ नाहीये………
